breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशासाठी कायपण… बजाज देणार १०० कोटी तर गोदरेज देणार ५० कोटींचा निधी

देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून वाहनउद्योग श्रेत्रातील बजाज समुहाने १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीचा वापर देशात आरोग्यसेवा पुरवाणाऱ्या यंत्रणांचे सबलिकरण करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. “आम्ही आमच्या समुहाच्या २०० स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सरकारबरोबर काम करत असून ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यासाठी आम्ही काम करु,” असा विश्वास बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी व्यक्त केला आहे.

गोदरेज समुहानेही करोनाच्या पार्श्वभूमीवर ५० कोटींची मदत जाहीर केली आहे. “या कठीण समयी ही मदत देणे सध्या गरजेचे आहे”, असं गोदरेज अण्ड बॉइजचे अध्यक्ष जमशेद गोदरेज यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटलं आहे. अगदी गाड्यांपासून ते आर्थिक गुंतवणूक श्रेत्रांमध्येही कार्यरत असणारा बजाज समुह हा १०० कोटींच्या मदतीची घोषणा करणारा चौथा समुह आहे. याआधी वेदांता, अक्सेस बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हरने सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्पांसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिलं आहे.

बजाज समुहाकडून दिला जाणारा निधी हा सरकारी रुग्णालयांमध्ये आयसीयूचा दर्जा वाढवण्यासाठी, व्हेंटीलेटर्ससाठी, चाचण्या घेण्याच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि आयसोलेशन वॉर्डच्या निर्मितीसाठी वापरला जाणार आहे. पुण्यामध्ये बजाजचे मुख्यालय असल्याने पुण्यातील रुग्णालयांसाठीच प्रामुख्याने हा निधी वापरला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे जिल्हा हा करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.

८१ वर्षीय बजाज यांनी काही आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलताना देशात उलट स्थलांतर सुरु असून लोकं आता ग्रामीण भागात जाऊ लागली आहेत, असं मत व्यक्त केलं होतं. “आमच्या मार्फत करण्यात येणारी आर्थिक मदत ही ग्रामीण भागातील व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरण्यात येत आहे. यामध्ये थेट आर्थिक मदत करणे आणि इतर महत्वाच्या सुविधा पुरवणे या गोष्टींचा समावेश होतो,” असं बजाज यांनी म्हटलं होतं.

जमशेद गोदरेज यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी कंपनीमार्फत देण्यात येणारा ५० कोटींचा निधी वापरला जाणार असल्याचे सांगितलं आहे. गोदरेज समुहाने महाराष्ट्राती सरकारी रुग्णालयांमध्ये ११५ बेड दिले आहेत. देशामधील करोनाच्या एकूण रुग्णांपैकी २१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ७५ बेड पुरवण्यासाठीही गोदरेजनेच मदत केली आहे. सरकारी यंत्रणांना वैद्यकीय मदत आणि संरक्षणात्मक गोष्टी म्हणजेच मास्क, सॅनिटायझर यासारख्या गोष्टी गोदरेज समुहाकडून सरकारी यंत्रणांना देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button