#CoronaVirus | अमेरिकेत लॉकडाउनविरोधात बंदुका घेऊन आंदोलन
वॉशिंग्टन | अमेरिकेत एका बाजूला करोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे लॉकडाउन हटवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लॉकडाउनविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी बंदुका घेऊन आंदोलन केले. अमेरिकेतील मिशिगन राज्यात हे आंदोलन झाले. तर, अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने गुरुवारी दोन हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी लॉकडाउन व निर्बंध घालण्यात आले आहेत.
लॉकडाउनच्या विरोधात याआधीदेखील निदर्शने झाली होती. गुरुवारी मात्र, मिशिगनमध्ये आंदोलकांनी बंदुका हातात घेऊन आंदोलन केले. आंदोलकांनी मिशिगन राज्याच्या प्रशासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत वादावादी झाली. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांनी बुलेटप्रूफ जॅकेटही घातले होते. आंदोलक हे रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असल्याची चर्चा आहे.