breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

‘त्या’ महिलेला ८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्या; ‘उबर’ला दणका

नवी दिल्ली |

अमेरिकेतील एका लवादाने दिलेल्या निर्णयामध्ये मोबाइल अ‍ॅपआधारित खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीला एका अंध महिला प्रवाशासोबत भेदभाव केल्याबद्दल १.१ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळजळ आठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही सर्व रक्कम या महिलेला देण्याचे आदेश लवादाने दिलेत. या महिलेने कंपनीच्या अ‍ॅप वापरुन गाडी बूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तब्बल १४ चालकांनी नकार दिल्याने तिने आपल्यासोबत कंपनी भेदभाव करत असल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. या सुनावणीदरम्यान उबरने चालकांकडून केल्या जाणाऱ्या भेदभावासाठी कंपनी जबाबदार नसल्याचं सांगताना उबर चालक हे कंत्राट पद्धतीवर काम करतात असा मुद्दा उपस्थित केला. मात्र हा मुद्दा लवादाने या प्रकरणामध्ये ग्राह्य धरला नाही. या निकालाबद्दल उबरने नाराजी व्यक्त केलीय. सॅन फ्रॅन्सिस्को येथे राहणाऱ्या लिसा लिर्विंग यांच्यासोबत उबरने भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. लिसा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आपण अंध असून बेर्णी नावाच्या आपल्या कुत्रीच्या मदतीने भटकंती करत असल्याचं सांगितलं. मात्र २०१८ साली उबर चालकांनी त्यांना सेवा देण्यास नाकारलं. लिसा यांना अनेक चालकांनी नकार दिला तर काहींनी त्यांची दृष्टी बनून सोबत राहणाऱ्या बेर्णी या कुत्रीसोबत टॅक्सीने घेऊन जाण्यास नकार दिल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

उबर चालकांनी या महिलेला रात्री अर्ध्या वाटेत सोडल्याने या महिलेला ऑफिसला जाण्यास उशीर झाला. त्यामुळे या महिलेला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. तर इतर दोन वेळी या महिलेचा उबर चालकांनी अपमान केला. इतकचे नाही तर या महिलेने यासंदर्भात कंपनीकडे तक्रार केली. त्यानंतरही या महिलेचा उबर चालकांकडून होणारा छळ थांबला नाही, अशी माहिती या महिलेच्या वकिलांनी बिझनेस इनसायडरशी बोलताना दिली. या अशा सेवांमुळे अंध आणि दृष्टीसंदर्भात त्रास असणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणं अपेक्षित आहे. मात्र चित्र उलट दिसत असून अशा व्यक्तींसोबत भेदभाव केला जातोय अशा शब्दांमध्ये या महिलेने आपली बाजू मांडली. अमेरिकन कायद्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसोबत असणाऱ्या प्राण्यांना (ज्यांना कम्पॅनियर असं म्हटलं जातं) त्या व्यक्तींसोबत कुठेही जाण्यासाठी परवानगी दिली जाते. असे प्राणी या व्यक्तींची मदत करत असल्याने त्यांना सगळीकडे अगदी विमानातही प्रवासाची मूभा दिली जाते. अमेरिकन कायद्यानुसार अशा प्रण्यांना प्रवास करण्यास नकार देणं हा कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा भेदभाव करण्यासमान आहे. मात्र उबरने जबाबदारी झटकत कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या चालकांच्या वागणुकीची जबाबदारी कंपनी घेऊ शकत नाही असं सांगितलं. मात्र हा दावा लवादाने फेटाळला आणि या महिलेला आठ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

वाचा- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button