breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चंद्रपूर दारूबंदी उठवली: देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत, सचिन सावंतांनी भाजपावर साधला निशाणा!

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अवैध दारूविक्री व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने, राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अनेक ग्रामपंचायती, महिला संघटना, बचतगट आदींनी दारूबंदीसाठी ठराव केले होते. मात्र आता दारूबंदी उठवण्यात आल्याने भाजपा नेते आक्रमक झाले असून, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी, चंद्रपुरमधील दारू बंदी संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते, हे दाखवणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “चंद्रपूरची दारुबंदी का उठवली यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार मालपाणीचे पुरस्कर्ते असलेल्या सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र भाजपा यांच्या प्रबोधनाकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक सुयोग्य कोण असेल बरं? भाजपाचा दुटप्पीपणा उघड करताना ऐका बरं फडणवीस काय म्हणतात ते!” असं सचिन सावंत यांनी ट्विट देखील केलं आहे.

“खरं म्हणजे सुधीरभाऊ तुम्ही खूप चांगल्या मानसिकतेतून चंद्रपुरमध्ये दारूबंदी केली. पण आता तुम्हाला देखील पश्चाताप होत असेल, की मी हे का केलं? याचं कारण आज नेत्यांच्या माध्यमातून अवैध दारूचं कॉर्पोरेटायझेशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कुणी किती दारू घेत आहे, याचं दरपत्रकच माझ्याकडे आहे. दादा.. तुम्ही जे म्हणाला होता ना की आम्ही तिथं दारू पुन्हा सुरू करू, तुम्हाला नाही सुरू करू देणार. त्यावेळी सगळे एकत्र येवून दारू बंदीचे पुरस्कर्ते बनतील. पण तुम्ही लक्षात ठेवा दारू बंदीचे पुरस्कर्ते नाहीत ते.., हे मालपाण्याचे पुरस्कर्ते आहेत, सगळ्यांना मालपाणी मिळत आहे.” असं फडणवीस या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. तर आता राज्य सरकारने चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.“करोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत? हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.”, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णयावरून भाजपा नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. “चंद्रपुरमधील उठवण्यात आलेली दारूबंदी दुर्दैवी आहे. एखादी गोष्ट अवैधपणे विकली जाते म्हणून त्यावरील बंदी हटवणे ही तर्कहीन गोष्ट आहे.” असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button