Pune। ‘रेपो’ दरकपातीने गृहनिर्माण क्षेत्राला चालना; गृहखरेदीदारांना मोठा दिलासा : मनिष जैन
RBI च्या १.२५% एकूण दरकपातीमुळे EMI कमी, बचतीत वाढ : बँकांना तातडीने दरकपात लागू करण्याचे क्रेडाई पुणेचे आवाहन
पुणे । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर करत चालू आर्थिक वर्षात एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची दरकपात लागू केल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनिष जैन यांनी या निर्णयाचे स्वागत करत यामुळे अर्थव्यवस्थेला तसेच गृहनिर्माण क्षेत्राला व्यापक दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले.
श्री. जैन म्हणाले की, “रेपो दरातील एकूण १.२५% कपातीमुळे कर्ज घेण्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल, तरलता वाढेल आणि व्यवसायांची गती सुधारेल. हे पाऊल अर्थव्यवस्थेला अधिक वेग देणारे आहे.”
गृहखरेदीदारांसाठी या निर्णयाचे परिणाम त्वरित जाणवतील, असे त्यांनी स्पष्ट केले. उदाहरण देताना ते म्हणाले की, ७५ लाख रुपयांच्या २० वर्षांच्या गृहकर्जावर मासिक हप्त्यात अंदाजे ६,००० रुपयांनी घट होऊ शकते. कर्जाच्या संपूर्ण कालावधीत यामुळे सुमारे १५ लाख रुपयांची बचत होण्याची शक्यता असून, त्यामुळे घर खरेदीची क्षमता आणि ग्राहकांचा आत्मविश्वास दोन्ही वाढेल.
यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील मागणीत महत्त्वपूर्ण वाढ होण्याची शक्यता व्यक्त करत श्री. जैन यांनी बँकांना ग्राहकांच्या हितासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले. “रिझर्व्ह बँकेच्या दरकपातीचा लाभ बँकांनी विलंब न लावता कर्जदारांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. कर्जदरांमध्ये त्वरित घट परावर्तित झाल्यास गृहखरेदीदारांसाठी घर घेणे अधिक परवडणारे व सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.
“रिझर्व्ह बँकेच्या दरकपातीने गृहखरेदीदारांसाठी नवे दार उघडले आहे. EMI मधील घट केवळ आर्थिक दिलासा नाही, तर स्वतःच्या घराच्या स्वप्नाला गती देणारी संधी आहे. आता बँकांनी हा फायदा तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हीच काळाची गरज आहे.”
— मनिष जैन, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे.




