अतिवृष्टीमुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने वाटाणा व शेवगा महागला
भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्य ग्राहक हैराण
नाशिक : अतिवृष्टीमुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने वाटाणा व शेवगा महागला असून, किरकोळ बाजारात २०० रुपये किलोने त्यांची विक्री होत आहे. या व्यतिरिक्त फळभाज्या व पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरु होते. या काळात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होत असल्याने भाव वाढू शकतात.सध्या अतिवृष्टीमुळे प्लॉवर, कोबी यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.
किमतीत मात्र घसरण झाल्याचे दिसून येते. दहा ते २० रुपयांना गड्डा मिळतो. पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली असून मेथी २५ ते ३० रुपये जुडी, कोथिंबीर १० ते २० रुपये, दुधी भोपळा, पालक २० रुपयांना तर शेपू २० ते ३० रुपयांना जुडी मिळते. शिमला व हिरवी मिरची २० रुपये पावशेर आहे.
हेही वाचा : भाजप नेत्या नवनीत राणा यांना हैदराबादहून धमकीचे पत्र
हिरवे वाटाणे ५० रुपयांना पावशेर आणि शेवग्याच्या शेंगा ४० ते ५० रुपयांना पावशेर या प्रमाणे मिळतात. टोमॅटो अवघे २० रुपये किलो असल्यामुळे उत्पादकांच्या चिंतेत अजून भर पडलेली दिसते. ढगाळ वातावरणात भाजीपाला टिकवणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.
पावसाळी टरबूज
सध्या हिवाळा हा ऋतू असला, तरी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडत असल्याने पावसाळ्यासारखे वातावरण अनुभवायला मिळते. या परिस्थितीत बाजारात टरबूज विक्रीसाठी दाखल झाले. २० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या या टरबुजांना चांगली मागणी आहे; तर काश्मिरी सफरचंद १०० रुपये किलोप्रमाणे मिळतात. केळी २० रुपये डझन, तर आवळा, लिंबू २० रुपयांना चार मिळतात. मक्याचे कणीस १० रुपयांना एक याप्रमाणे बाजारात उपलब्ध आहे.




