देशात सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढीचा भडका
![Fuel price hike for the seventh day in a row in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/petrol-.jpg)
मुंबई – या महिन्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याचे नावच घेत नाहीये. देशभरात आज सलग सातव्या दिवशी इंधन दरात मोठी वाढ झाली. पेट्रोल प्रति लिटर ३० पैशांनी, तर डिझेल ३५ पैशांनी महागले. त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत इंधनाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
मागील महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. तर या महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल २५ पैशांनी आणि डिझेल ३० पैशांनी महागले होते. या सततच्या दरवाढीमुळे देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या पार गेले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, पद्दुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्किम, ओडिसा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. तर आता पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. १० दिवसांत डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे.
दरम्यान, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०४.४४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर ९३.१८ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच मुंबईत प्रति लिटर पेट्रोलची किंमत ११०.३८ रुपये आणि डिझेलची किंमत १०१.०० रुपये इतकी आहे.