क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सने प्रथमच तब्बल ६०० कोटींचे चलन लंपास केले
![For the first time, hackers stole over Rs 600 crore from crypto platforms](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Hack.jpg)
हॅकर्सने डिसेंट्रलाइज्ड फायनान्स प्लॅटफॉर्म क्युबिट फायनान्सवरून ८ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ६०० कोटी रुपये मूल्याचे क्रिप्टोकरन्सी चलन चोरले आहे. ही कंपनी आता चोरी केलेली क्रिप्टोकरन्सी परत करण्याची विनंती हॅकर्सला करत आहे. चोरी केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीच्या हिशोबाने हे २०२२चे आतापर्यंतचे सर्वात मोठे हॅकिंग आहे.
क्युबिट फायनान्सने या हॅकिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, हॅकर्सने बायनान्स स्मार्ट चेनवर (बीएससी) उधार घेण्यासाठी असीमित एक्सप्लोसिव्ह अथेरियमचे मायनिंग केले. तसेच कंपनीने एका पोस्टमध्ये म्हटले, ‘आमची टीम भविष्यात उचलल्या जाणाऱ्या पावलांसाठी सिक्युरिटी आणि नेटवर्क पार्टनर्ससोबत मिळून काम करत आहे. क्युबिट फायनान्सच्या टीमने थेट हॅकर्सशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. क्युबिट युजर्सचे नुकसान कमी करता यावे हा त्यामागील हेतू आहे.’
त्याचबरोबर कंपनीने हॅकर्सना रक्कम परत करण्याच्या बदल्यात जास्तीत जास्त बग बाउंटी देण्याचा प्रस्तावही दिला आहे. बग बाउंटी एक मौद्रिक रिवॉर्ड आहे, तो एथिकल हॅकर्सना ऍप्लिकेशन/सिस्टिम्समध्ये सिक्युरिटीशी संबंधित जोखीम किंवा कमजोरी शोधणे आणि रिपोर्ट करण्यासाठी दिला जातो. बग बाउंटी प्रोग्राम कंपन्यांना काळानुसार सतत आपल्या सिस्टिमच्या सुरक्षा स्थितीत सुधारणा करण्यासाठी हॅकर कम्युनिटीचा फायदा घेण्याची परवानगी देते.