जीआयसीची रिलायन्स रिटेलमध्ये ५ हजार ५१२.५ कोटींची गुंतवणूक
मुंबई – सिंगापूरच्या जीआयसी या गुंतवणूक कंपनीने रिलायन्स रिटेलमध्ये ५,५१२.५ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही गुंतवणूक १.२२ टक्के आहे.
गेल्या काही आठवड्यात रिलायन्स रिटेलमध्ये झालेली ही सहावी मोठी गुंतवणूक आहे. रिलायन्स उद्योग समूहाची रिलायन्स रिटेल जगभरातील गुंतवणूकदार कंपन्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. त्यामुळे त्यात परदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात रिलायन्स जिओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत होती. त्यानंतर आता रिलायन्सची दुसरी उपकंपनी रिलायन्स रिटेलमध्येही मोठी गुंतवणूक होत आहे. सिंगापूरच्या जीआयसीचे जागतिकस्तरावर मोठे जाळे आहे. या कंपनीची उज्वल परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मी स्वागत करतो, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
यामुळे रिलायन्स रिटेलमध्ये आतापर्यंत ३० हजार ३६० कोटींची गुंतवणूक झाली आहे. ती रिलायन्स रिटेलच्या एकूण भाग भांडवलाच्या ६.८७ टक्के एवढी आहे.
माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिलायन्स रिटेलच्या साखळी दुकानांचे जाळे आहे. त्यांचे देशभरातील नेटवर्क भक्कम आहे. इन्फ्रास्ट्रक्चरही मजबूत आहे. ते ग्राहक आणि गुंतवणूकदारांना चांगला फायदा देऊ शकते. त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती जीआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीम चाऊ काईट यांनी दिली.