पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; जी-७ परिषदेत होणार सहभागी

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवार) ३ देशांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. ते कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. तसेच, सायप्रस आणि क्रोएशिया या देशांनाही भेटी देतील. सर्वप्रथम मोदी सायप्रसमध्ये दाखल होतील. त्या देशाला २ दशकांहून अधिक काळानंतर भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरतील.
परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी १६ आणि १७ जून यादिवशी कॅनडामध्ये असतील. त्या देशाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून ते जी-७ परिषदेला उपस्थित राहतील. त्यामुळे सलग सहाव्यांदा जी-७ परिषदेत मोदींच्या सहभागाची नोंद होईल.
संबंधित परिषदेत महत्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. जी-७ गटामध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या देशांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची संधीही मोदींना उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा – गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा! SBI ने कमी केले कर्ज व्याजदर, नवीन दर जाणून घ्या
मागील काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेल्याचे चित्र आहे. ते संबंध सुरळित करण्याच्या दृष्टीने जी-७ परिषदेला महत्व प्राप्त झाले आहे.
त्याशिवाय, सायप्रस आणि क्रोएशिया या देशांशी भारताचे द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी मोदींची भेट लक्षणीय ठरेल. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे १८ जून यादिवशी मोदी क्रोएशियात असतील. ते त्या देशाला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरतील.