गुड न्यूज! ब्रिटनच्या राजघराण्यात नवी पाहुणी
![Good news! A new guest in Britain's royal family](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/download-2.jpg)
कॅलिफोर्निया – ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्कल यांनी एका मुलीला जन्म दिला असून तिचे नाल लिलिबेट डायना असे ठेवण्यात आले आहे. प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटनच्या राजघराण्यापासून काहीसा दुरावा पत्करलेला असल्याच्या काळातच कॅलिफोर्नियात त्यांच्या लेकीचा जन्म झाला आहे. मात्र असे असले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महत्त्वाचे म्हणजे लिलिबेट हे त्यांचे दुसरे बाळ आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मेगन यांनी एका सुदृढ बालकाला जन्म दिला. रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा करत या दाम्पत्याने त्यांचं दुसरं मुल, लिलिबेट लिली डायना माऊंटबेटन विंडसर हिचे स्वागत केल्याचे सांगितले. महत्त्वाचे म्हणजे शाही कुटुंबाकडून ही आनंदवार्ता सर्वांनाच देण्यात आलेली असली तरी बाळाचा फोटो मात्र अद्यापही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
दरम्यान, लिली हे नाव मुलीची पणजी म्हणजेच राणी एलिझाबेथ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. राणी एलिझाबेथ यांना कुटुंबात प्रेमाने लिलिबेट या नावाने संबोधण्यात येते. तर मुलीचे डायना हे नाव तिच्या आजीवरून म्हणजेच प्रिन्स हॅरी यांच्या दिवंगत आईच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना, यांना या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली.