महापालिका सेवा निवृत्त कर्मचार्यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ द्या : आमदार महेश लांडगे
![Budget that makes India self-reliant and strong: MLA Mahesh Landage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/mahesh-landge.jpg)
- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात महापालिका कर्मचार्यांचे मोलाचे योगदान आहे. कर्मचार्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरात अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. मात्र, कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांना वैद्यकीय सेवा मोफत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या सेवा निवृत्त कर्मचार्यांना धन्वंतरी आरोग्य योजना आणि विमा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना १ सप्टेंबर २०१५ पासून सुरू केली होती. त्यासाठी धोरणही तयार केले होते. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. कुटुंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्ती यामध्ये उपचार घेऊ शकत होते.
धन्वतंरी योजनेमध्ये सेवेत कार्यरत असणार्या अधिकारी, कर्मचार्यांकडून ३०० रुपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्यांकडून १५० रुपये स्वहिस्सा जमा केला जात होता. जमा होणार्या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम पालिका धन्वंतरी निधीत जमा करत होती. धन्वतंरी योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांसमवेत करारनामा केला होता. मात्र, ही योजना बंद करून कर्मचार्यांसाठी वैद्यकीय विमा योजना सुरू करण्यात आली. यामध्ये सेवा निवृत्त कर्मचार्यांना स्थान देण्यात आले नव्हते. सेवा निवृत्त होणार्या कर्मचार्यांना महापालिकेच्या वतीने उतार वयात त्यांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी आरोग्य योजना अथवा विमा योजना सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.
- वीमा योजनेचाही लाभ द्या : आमदार लांडगे
धन्वतंरी योजने प्रमाणे सेवा निवृत्त कर्मचार्यांकडूनही काही हिस्सा व महापालिकेचा ज्यादा हिस्सा जमा करावा. शहरातील नामाकिंत रूग्णालयांमध्ये सेवा निवृत्त कर्मचार्यांना उपचाराची सुविधा उपल्बध करून देण्यासाठी आयुक्त म्हणून आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने याचा त्वरीत निर्णय घेऊन सेवा निवृत्त कर्मचार्यांसाठी विमा योजना राबवावी, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.