Diwali विशेष लेख : दिपावली सणाचे महत्त्व व साजरी करण्याची परंपरा
लेखन : कु. कल्पना प्रताप कर्पे

‘दिपावली’ म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. भारतात प्रत्येक घराघरात साजरा होणारा आणि सर्व धर्मांतील लोक आनंदाने सामील होणारा एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. याला धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. या लेखातून आपण या सणाचे संपूर्ण महत्त्व, परंपरा आणि बदलत्या स्वरूपाचा मागोवा घेणार आहोत.
दिपावली म्हणजेच ‘दिव्यांची माळ’. यामागे एक संदेश आहे — अंध:कारावर प्रकाशाचा विजय. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या सणाशी अनेक पौराणिक कथांचा संबंध आहे. प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, नरकासुराचा वध झाला, भगवान विष्णूने वामनावतार घेतला, महालक्ष्मी देवी प्रकट झाली, सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला — या सर्व शुभ घटनांचा संबंध दिवाळीच्या पाच दिवसांशी आहे. त्यामुळेच हा सण फार मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.
दिपावली सणाची सुरुवात वसुबारस या दिवसाने होते. या दिवशी गाईचे पूजन केले जाते कारण गाईला सर्व देवतांची माता मानले जाते. त्यानंतर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि शेवटी भाऊबीज — असे पाच दिवस साजरे होतात. प्रत्येक दिवसाला वेगवेगळं धार्मिक व सामाजिक महत्त्व आहे.
या सणाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन. दिवाळी सण सूर्याच्या दक्षिणायन स्थितीत येतो. या काळात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. त्यामुळे प्रकाश कमी असतो. म्हणूनच अंधाराचा नाश करण्यासाठी दिवे लावले जातात. ही परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर पूर्णपणे वैज्ञानिक आधारही असलेली आहे.
अध्यात्मिक दृष्टिकोनातून दिवाळीचा अर्थ खूप खोल आहे. ‘दीप’ म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञानरूपी अंधार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश मिळवणे — हेच या सणाचं मूळ उद्दिष्ट आहे. म्हणून नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतचा काळ उपासना, साधना आणि आत्मविकासासाठी उपयुक्त मानला जातो.
हेही वाचा – ‘मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्याप्रमाणात आयोजन करणार’; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

परंपरेनुसार दिवाळीच्या काळात घराची स्वच्छता केली जाते, अंगाला उटणे लावून स्नान केले जाते, रांगोळ्या काढल्या जातात, आकाशकंदील लावले जातात, मातीच्या पणत्या प्रज्वलित केल्या जातात. घराघरात गोडधोड फराळाचे पदार्थ तयार केले जातात आणि ते नातेवाईक, शेजारी यांच्यात वाटले जातात. लहान मुले अंगणात मातीचे किल्ले बनवतात, दिव्यांची आरास करतात आणि खेळता खेळता सांस्कृतिक वारसा जपत असतात.
परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीने आणि तंत्रज्ञानाच्या अति वापरामुळे या सणाच्या स्वरूपात बरेच बदल झाले आहेत. मातीच्या पणत्यांऐवजी विद्युत दिवे आले, घरगुती फराळाऐवजी रेडीमेड मिठाई व स्नॅक्स आले, कागदी रांगोळ्या आल्या, उटण्याऐवजी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने आली. पूर्वीचा उत्साह, आत्मियता आणि सामाजिक बंध आता कमी होत चालले आहेत. लोक एकमेकांना भेटण्याऐवजी फक्त मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर शुभेच्छा पाठवून समाधान मानतात. फराळ वाटणं, एकत्र येणं, सणाचा एकत्र अनुभव घेणं या गोष्टी फारशा उरलेल्या नाहीत. परिणामी सण आहे, पण त्यातला ‘आनंद’ हरवलेला जाणवतो.
आज आपल्यावर जबाबदारी आहे की या बदलत्या काळातही आपली धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्यं आपण जपली पाहिजेत. आपल्या पुढच्या पिढीला या सणामागील खरी परंपरा आणि मूल्यं समजावून सांगितली पाहिजेत. दिवाळी म्हणजे केवळ फटाके फोडण्याचा किंवा सुट्टी घालवण्याचा सण नाही, तर एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा, नातेसंबंध दृढ करण्याचा, आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशात न्हालेलं जाण्याचा एक पवित्र कालावधी आहे.
या लेखाच्या माध्यमातून माझा एकच प्रयत्न आहे – आपण पुन्हा एकदा दिवाळी सणाचं खरे महत्त्व समजून, तो पूर्वीसारख्या आनंदाने, उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करावा. आपला पारंपरिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा. ही दिपावली आपणा सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभ दिपावली!




