निदर्शने रोखण्यासाठी यासिन मलिक पोलिसांच्या ताब्यात
- मिरवेझ उमर फारुख स्थानबद्ध
श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभुमीवर जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिकला आज पोलिसांनी ताब्यात घेतले. तर हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचा अध्यक्ष मिरवेझ उमर फारुख याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. विभाजनवाद्यांकडून कोणत्याही प्रकारे आंदोलन किंवा निदर्शने केली जाऊ नये यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
यासिन मलिकला मैसुमा येथील निवासस्थानीच ताब्यात घेण्यात आले आणि कोठीबाग येथील पोलिस ठाण्यामध्ये डांबण्यात आले आहे. मिरवेझ फारुख याला निगीन येथील घरीच स्थानबद्ध करण्यात आले आहे. हुर्रियतच्या जहाल गताचा अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनाही ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले आहे.
“जॉईंट रेसिस्टन्स लीडरशीप’ या बॅनरखाली काश्मीरातील विभाजनवाद्यांनी मंगळवारी एकत्र येऊन सुरक्षा रक्षकांच्या कारवाईचा आणि पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येचा निषेध करणारा मोर्चा पुकारला होता. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात काही नागरिकही ठार झाले होते.