हैतीला 5.9 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/1-2-3.jpg)
पोर्ट औ प्रिन्स: कॅरिबियन समुद्रातील हैतीला शनिवारी 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत तसेच एक चर्च देखील पडले आहे. हैतीला 2010मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा धक्का आहे.
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडील पोर्ट-जे-पै या ठिकाणापासून 18 किलोमीटर लांब होता. पोर्ट-दे-पै, ग्रॉस मोर्ने, चांसोल्म आणि टर्टल या परिसरात भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. ज्या इमारती कोसळल्या आहेत त्यामध्ये सेंट मायकल चर्चचा देखील समावेश आहे.
हैतीसह डोमिनिक रिपब्लिक या शेजारच्या देशाला देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हैती उच्च भूकंप प्रवण क्षेत्रात येणारा देश आहे. 2010मध्ये राजधानीत झालेल्या 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे जवळ जवळ 3 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.