स्वप्न अधुरेच; सैन्य भरतीवरून परतणाऱ्यांना टँकरनं चिरडलं, दहा जणांचा मृत्यू
लष्करात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दहा तरूणांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. हरियाणातील जिंदमध्ये मंगळवारी रात्री टँकरने रिक्षाला दिलेल्या धडकेमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हिसार येथे लष्कर भरतीवरून परतत असताना त्या तरूणांवर काळाने घाला घातला. रामराय गावाजवळ तेलाच्या टँकरने रिक्षाला चिरडल्यामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सैन्य भरतीवरून परतणाऱ्या आठ तरूणांचा सहभाग होता. मंगळवारी सकाळी हिसारमध्ये लष्करात भरतीत सहभागी झाल्यानंतर रिक्षानं आठ जण परतत होते. त्याचदरम्यान भरधाव वेगानं येणाऱ्या तेलाच्या टँकरनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये रिक्षाचालक आणि अन्य एकाचा समावेश आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, सैन्य भरतीसाठी गेलेल्या सर्व तरुणांनी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी पार केली होती. दिवसभराची प्रक्रिया संपल्यानंतर घरी परतत असताना काळाने घाला घातला आणि त्यांच स्वप्न अधुरेच राहिले. या अपघातामध्ये एक जण गंभीररीत्या जखमी आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.