‘सोळावं वरीस धोक्याचं’ याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये- शिवसेना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-and-uddhav-thackeray.jpg)
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना संपादकीयमधून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपाने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपाचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय ?
कर्नाटकात भारतीय जनता पक्ष बहुमताच्या सीमारेषेवर जाऊन थांबला. २२४ च्या विधानसभेत भाजपने १०४ जागा जिंकून विजय मिळवला. काँग्रेसचा घोडा ७८ जागांवर अडला. देवेगौडा यांच्या जनता दलाने ३८ जागा जिंकल्या. एखाद दुसरा अपक्ष वगळता इतरांना फारसे स्थान मिळाले नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीचाही सीमा भागात दारुण पराभव झाला. तेथील मराठी बांधवांनी जणू ठरवूनच हा स्वतःचा पराभव घडवून आणला. कर्नाटकच्या विधानसभा निकालाचे हे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात राज्य भारतीय जनता पक्षाचेच येणार याविषयी आज खात्रीने कुणीच सांगू शकत नाही. गोवा, मणिपूर, मेघालय, नागालँडसारख्या राज्यांत साधे बहुमत नसतानाही तेथील राज्यपालांनी भाजपास सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्या मानाने कर्नाटकातील त्या पक्षाचा विजय बाळसेदार आहे.
आतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव झाला याचा अर्थ मोदींची किंवा त्यांच्या पक्षाची लहर होती असे मानायला आम्ही तयार नाही. मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते तेव्हाही भाजपने कर्नाटक जिंकलेच होते व ते राज्य संपूर्ण बहुमताचे होते. मावळत्या विधानसभेत भाजपचे ४० आमदार होते. त्यामुळे त्यांचे साठेक आमदार वाढले व काँग्रेसच्या जागा घटल्या. कुठल्याही सरकारविरुद्ध वातावरण हे निर्माण होतच असते. शेवटच्या काळात काँग्रेसने जे धर्माचे राजकारण केले ते त्यांना फटका देऊन गेले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वतंत्र लिंगायत धर्माचे राजकारण केले. हिंदू विरुद्ध लिंगायत अशी दुफळी माजवून राजकीय फायद्याचे गणित मांडले, ते साफ चुकले.