सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण संबंधित न्यायालयाकडे वर्ग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sunanda-pushkar-.jpg)
नवी दिल्ली – सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण आज विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. दिल्ली महानगर दंडाधिकारी धर्मेंद्र सिंह यांनी हे प्रकरण अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्या न्यायालयाकडे वर्ग केले. या प्रकरणी सुनंदा पुष्कर यांचे पती आणि कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण थरूर हे संसद सदस्य असल्याने हे प्रकरण राजकीय व्यक्तींसाठी विशेष नियुक्त केलेल्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. न्या. समर विशाल यांच्या न्यायालयापुढे या प्रकरणाची सुनावणी 28 मे रोजी होणार आहे.
लोकसभेतील खासदार असलेल्या थरूर यांच्यावर 14 मे रोजी आरोपपत्र ठेवल्याने त्यांना समन्स पाठवण्यात यावे, अशी मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायलयाकडे केली होती. थरूर यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. या संदर्भात तब्बल 3 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून केवळ थरूर यांच्या एकट्यावरच आरोप ठेवण्यात आले आहेत.