सुखोई-३० लढाऊ विमान पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Sukhoi-Su-30-IAF.jpg)
पुलवामा हल्ल्याच्या उत्तरासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतादरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या विमानांच्या मारामारीत (डॉग फाइट) भारताचे एक सुखोई-३० लढाऊ विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संरक्षण मंत्रालयाने खोडून काढला आहे.
संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, हवाई दलाकडून बालाकोट हल्ल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तानी विमानांची हालचाल लक्षात आल्यानंतर तात्काळ भारतीय लढाऊ विमानांनी आपली सज्जता दर्शवत पाक विमानांना पिटाळून लावले. यासाठी भारतीय हवाई दलाचे मिराज-२०००, सुखोई-३० आणि मिग-२१ विमांनाचा वापर करण्यात आला होता.
यावेळी पाकिस्तानकडून एफ-१६ विमानांचा वापर करण्यात आला होता. ज्यातून अनेक एएमआरएएएम क्षेपणास्त्र डागण्यात आली होती. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानचे हे एफ-१६ विमान पूर्व राजौरी जिल्ह्यात पाडण्यात आले होते. यावेळी एक स्थानिक नागरिकही जखमी झाला होता. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानकडून हे विमान वापल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला होता, तसेच या विमानांचे अवशेष दाखवत पुरावेही दिले होते.
मात्र, पाकिस्तान सुरुवातीपासूनच याचा इन्कार करीत आला आहे. मात्र, भारताने हे पुरावे अमेरिकेकडे सोपवले आहेत. यानंतर अमेरिका संपूर्ण चौकशीनंतर पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा वापर भारताविरोधात का आणि कसा केला याचा छडा लावेल. कारण, अमेरिकेनेच पाकिस्तानला ही विमाने दिली आहेत, ही विमाने देण्यापूर्वी याचा वापर भारताविरोधात होता कामा नये असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले होते. मात्र, भारताचे विमान पाडल्याच्या पाकच्या दाव्यामुळे त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.