breaking-newsराष्ट्रिय

सीबीआय खटल्यातून न्या. सिक्री यांचीही माघार

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीतून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यापाठोपाठ न्यायाधीश ए. के. सिक्री यांनीही गुरुवारी माघार घेतली. त्यामुळे या याचिकेवर नव्या खंडपीठापुढे सुनावणी होईल.

सीबीआयचे तत्कालीन संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने १० जानेवारी रोजी हंगामी संचालक म्हणून राव यांची नियुक्ती केली होती. या समितीत न्यायाधीश सिक्री यांचाही समावेश होता. राव यांच्या नियुक्तीला ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण बुधवारी न्या. सिक्री यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी आले. त्यावेळी या प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेत असल्याचे न्या. सिक्री यांनी याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे यांना सांगितले. ‘‘तुम्ही माझी भूमिका समजू शकता. या प्रकरणाची सुनावणी या खंडपीठापुढे होणार नाही’’, असे न्या. सिक्री हे दवे यांना म्हणाले.

‘‘हा प्रकार निराशाजनक असून, न्यायाधीशांना या प्रकरणाची सुनावणी घेण्याची इच्छा नाही, असे त्यातून सूचित होते. याआधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुनावणीतून माघार घेतली होती. आता तुम्हीही माघार घेत आहात’’, असे वकील दुष्यंत दवे हे न्या. सिक्री यांना उद्देशून म्हणाले. मात्र, याबाबत आपण अधिक भाष्य करू शकत नाही, असे न्या. सिक्री यांनी नमूद केले. सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड करणाऱ्या समितीचा सदस्य असल्याचे कारण देत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी खटल्यातून माघार घेतली होती.  त्यांनी हे प्रकरण न्या. सिक्री यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले होते.

सीबीआय संचालकांचे नाव निश्चित करण्यासाठी बोलावलेली बैठक अनिर्णित

नवी दिल्ली :  सीबीआयच्या यानंतरच्या प्रमुखांचे नाव निश्चित करण्यासाठी गुरुवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत काहीही निर्णय न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पदासाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादी त्यांच्या संपूर्ण माहितीसह समितीच्या सदस्यांना सोपवण्यात आली, मात्र या मुद्दय़ावर आतापर्यंत काही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. अंतिमत: नाव निश्चित करण्यासाठी समितीची पुन्हा लवकरच बैठक होईल, असे हा अधिकारी म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या या बैठकीला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित होते.

या बैठकीत अधिकाऱ्यांची नावे सादर करण्यात आली आणि त्यांच्यावर चर्चा झाली. त्यांच्या अनुभवासह कार्यकाळाचा उल्लेख करण्यात आला नाही. याबाबत आवश्यक ती सर्व माहिती देण्यास आम्ही त्यांना सांगितले आहे. आगामी बैठक बहुधा पुढील आठवडय़ात होईल, असे खरगे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button