सिद्धरामय्या यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
बंगळूर – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची पीछेहाट झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला. विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी सरकार स्थापनेसाठी जेडीएसला पाठिंबा देण्याचा कॉंग्रेसचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजभवनात पोहचून त्यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
सिद्धरामय्या यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यातील एका जागेवर ते विजयी झाले; तर दुसऱ्या जागेवर पराभूत झाले. सिद्धरामय्या यांची 2005 मध्ये पक्षविरोधी कारवायांबद्दल जेडीएसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. आता 13 वर्षांनंतर सिद्धरामय्या यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी एच.डी.कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा जाहीर केला. राजकारणाची अजब किमया म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.