सिंगापुरात मोदींची अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी चर्चा

सिंगापुर- तीन देशाच्या दौऱ्याच्या अखरेच्या टप्प्यात सध्या सिंगापुरच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जीम मॅटिस यांच्याशी सुरक्षा विषयक बाबींवर तसेच जागतिक स्थितीवर चर्चा केली. शांग्रीला डायलॉगच्या निमीत्ताने हे नेते तेथे एकत्र आले आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही स्वतंत्र चर्चेची संधी घेतली.
इंडो पॅसिफिक भागाच्या शांतता आणि सुरक्षेसाठी भारत आणि अमेरिका यांच्यात अधिक जवळीक साधण्याची गरज आहे असे प्रतिपादन या परिषदेत मॅटिस यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि त्यांच्या भेटीला विशेष महत्व आहे. अमेरिकेने आपल्या पॅसिफीक कमांडला इंडो-पॅसिफिक कमांड असे नाव दिले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनने व्हीएतनाम, मलेशिया, ब्रुनोई आणि तैवान जवळील साऱ्याच सागरी हद्दीवर आपला हक्क् सांगितल्यानंतर चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाउल उचलले असून त्यात त्यांनी भारतालाही महत्व देण्याचा प्रयत्न केला आहे.





