सलाम ! तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाने लावली जीवाची बाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Cop.jpg)
सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र अनेकदा खाकी वर्दीतला पोलीस पाहिला की अनेकांना सुरक्षित वाटण्याऐवजी भीतीच वाटत असते. समाजात उभ्या राहिलेल्या पोलिसांच्या खराब प्रतिमेसाठी बॉलिवूड चित्रपट आणि स्वत: पोलीस खातंही तितकंच जबाबदार आहे. पण फक्त काही जणांमुळे संपूर्ण खात्याला दोष देणं चुकीचं. खात्यात काही असेही असतात ते जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा करत असतात. रायपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे हे सिद्ध झालं आहे
एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाहतूक पोलीस कर्मचारी चंद्र प्रकाश याने आपला जीव धोक्यात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला आहे. चंद्र प्रकाश याची शास्त्री चौकात ड्यूटी होती. सकाळी सात वाजल्यापासून चंद्र प्रकाश ड्युटीवर हजर होता.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, एक तरुण स्कायवॉकवर चढून गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी दोन खांबांच्या मधे तो अकडला. जवळपास अडीच तास खांबाच्या सहाय्याने तो तिथेच लटकत होता. लोकांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी काहीजणांनी चंद्र प्रकाशला जाऊन घटनेची माहिती दिली. चंद्र प्रकाश याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कंट्रोल रुमला कळवलं. मात्र मदत येण्यास उशीर होत असल्याचं लक्षात येताच चंद्र प्रकाश याने पुढाकार घेत मदतीसाठी धाव घेतली. शिडीच्या सहाय्याने त्याने स्कायवॉकवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिडीची उंची लहान असल्याने शक्य होत नव्हतं. मात्र हार न पत्करता चंद्र प्रकाश याने उडी मारुन स्कायवॉक गाठला आणि तरुणाचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाची मानसिक स्थिती योग्य नाही नव्हती. दरम्यान चंद्र प्रकाश यांनी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं जात असून पोलीस प्रशासनानेही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.