संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर
- मानवाधिकारांच्या बाबतीत पक्षपातीपणाचा आरोप
वॉशिंग्टन डी.सी – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमधून अमेरिकेने अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. परिषद ही मानवाधिकारांच्या बाबतीत पक्षपात करत असून ही परिषद मानवाधिकारांच्या रक्षणासाठी आता पूर्वीप्रमाणे सक्षम नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत निकी हेले यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याविषयी घोषणा केली आहे.
संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषद ही काही ठराविक देशांमधीलच मानवाधिकार उल्लंघनाविषयी नेहमी वक्तव्य करते. परंतू व्हेनेझुएला, इराण या सारख्या देशांमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे ती सोयीने दुर्लक्ष करते. इतकेच नव्हे तर ज्या देशांमध्ये मानवाधिकारांना काहीच किंमत नाही, अशा देशांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना परिषदेचे सदस्यत्व बहाल केले जात आहे. त्यामुळे ही परिषद फक्त एका बुजगावण्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये केला.
तसेच परिषदेच्या इस्राईलविरोधी धोरणांवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. तसेच अमेरिका परिषदेमधून जरी बाहेर पडत असली तरी देखील मानवाधिकारांच्या रक्षणाबाबतीत अमेरिका नेहमी सजक आणि जागरूक राहील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेकडून वारंवार झाली होती टीका
अमेरिकेने यापूर्वीही परिषदेच्या अनेक निर्णयांवर आणि वक्तव्यांवर टीका केलेली आहे. व्हेनेझुएलासह अनेक देशांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या मानवाधिकारविरोधी कृत्यांवर परिषदेने कधीही वक्तव्य केले नाही. परंतु म्यानमारमध्ये झालेल्या रोहिंग्या विस्थापानावर आणि जेरुसलेमला अमेरिकेने मान्यता दिल्यानंतर परिषदेचे नेते बिन राद अल हुसैन यांनी या दोन्ही गोष्टींना मात्र कडाडून विरोध केला होता.
तसेच परिषदेने पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ एक प्रस्तावही मंजूर केला होता. याचवेळी अमेरिकेने परिषदेवर पक्षपात करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिका आपल्या सदस्यत्वावर विचार करेल असा इशारा देखील दिला होता.