श्रीमंत होण्यासाठी ३३ ट्रकचालकांची हत्या, टेलर ते सीरिअल किलरपर्यंतचा प्रवास ऐकून पोलीस चक्रावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1Murder_1_13.jpg)
मध्य प्रदेश पोलिसांनी जेव्हा आदेश खांब्रा याला अटक केली तेव्हा त्यांना तो एक साधा गुंड असेल असं वाटलं होतं. व्यवसायाने टेलर असणाऱ्या आदेश खांब्राने जेव्हा पोलिसांसमोर आपले गुन्हे उघड करण्यास सुरुवात केली तेव्हा पोलीसही चक्रावले. आदेश खांब्राने आपण एकूण ३३ जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रीमंत होण्यासाठी आदेश खांब्रा सीरियल किलर झाला आणि गेल्या आठ वर्षात त्याने तब्बल ३३ जणांची हत्या केली आहे. यामध्ये सर्वजण ट्रकचालक आणि क्लिनर्स होते.
आदेश खांब्रासहित एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. जयकिरण प्रजापती आणि आदेश खांब्रा हे दोघे या टोळीचे म्होरके होते. यांच्या अटकेमुळे ट्रकचालक आणि क्लिनरची हत्या करुन लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, नाशिकसहित अनेक शहरांमध्ये हत्या केल्या आहेत. ट्रकचालक, क्लिनर्सना गुंगीचं औषध देऊन त्यांची हत्या करुन लुटणे ही या टोळीची मोडस ऑपरेंडी होती.
अटक केल्यानंतर आदेश खांब्रा याने आपण टोळीसोबत मिळून एकूण २९ ट्रकचालक आणि क्लिनर्सची हत्या केल्याची कबुली दिली होती. नंतर चौकशीत त्याने अजून हत्या केल्याचं उघड केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश खांब्राचं नाव कोणत्याही वॉण्टेड लिस्टमध्ये नव्हतं.
भोपाळ पोलिसांनी गेल्या शुक्रवारी आदेश खांब्रा याच्यासहित जयकिरण प्रजापती आणि नागपूरच्या तुकाराम बंजारा यांना अटक केली. मालवाहू ट्रकचालक, क्लिनरची हत्या आणि चोरीच्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर चौकशी केली असता खांब्रा याने एकूण ३३ हत्यांमध्ये आपला सहभाग असल्याचं उघड केलं. चार राज्यांमध्ये या हत्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशाचा समावेश होता. महत्त्वाचं म्हणजे चौकशीदरम्यान खांब्रा याने आपल्याला एकूण किती हत्या केल्या हे नेमकं आठवत नसल्याचंही सांगितलं.
खांब्रा याने दिलेल्या कबुलीनुसार, मधय प्रदेशात १५, महाराष्ट्रात ८, छत्तीसगडमध्ये ५ आणि ओडिशामध्ये दोन हत्या करण्यात आल्या. इतर हत्या कुठे झाल्यात याची माहिती पोलीस घेत आहेत. भोपाळ पोलिसांनी जिथे हत्या झाल्या आहेत त्या राज्यांना पत्र लिहून छडा न लागलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर्सच्या हत्येची माहिती मागवली आहे.
‘खांब्रा याला प्रत्येक हत्येसाठी ५० हजार रुपये मिळायचे. जेव्हा तो टोळीत सामील झाला तेव्हा त्याचा उद्देश फक्त पैसे कमावणे होता. पण काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा अपघात झाला आणि त्याला उपचारासाठी कर्ज घ्यावं लागलं. कर्ज फेडण्यासाठी तो अजून गुन्हे करु लागला’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
खांब्रा अत्यंत चलाखीने हत्या करत असल्याने नागपूर पोलीस २०१४ मध्ये अटक करुनही गुन्हा सिद्ध करु शकले नाहीत, ज्यामुळे त्याची जामीनावर सुटका झाली. हत्या करण्याआधी खांब्रा फक्त सीम कार्ड नाही तर मोबाइलही बदलत असे. गेल्या चार वर्षात त्याने एकूण ५० सीम कार्ड आणि ४५ मोबाइल वापरले आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे.