शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेहाना फातिमाची BSNL कडून बदली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/rehana.jpg)
केरळमधील शबरीमला मंदिरातील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवण्यात आल्यानंतर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चर्चेत आलेल्या महिला कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची बीएसएनएलने बदली केली आहे. शबरीमलाच्या अय्यपा मंदिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही १० ते ५० वयोगटातील महिलांना अजूनही प्रवेश नाकारण्यात येत असून मंदिर पाच दिवसांसाठी खुले झाल्यानंतर पाच ते दहा महिलांनी तेथे जाण्याचे केलेले प्रयत्न फसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहानाची बदली अशा ठिकाणी करण्यात आली आहे जिथे ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याची गरज नाही. यशिवाय बीएसएनएलने त्यांच्याविरोधात चौकशी सुरु केल्याचंही समजत आहे. रेहानाची बदली करणं तिच्यावर करण्यात आलेली कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.
रेहाना फातीमा बीएसएनएलच्या कस्टमर रिलेशन विभागात टेलिकॉम टेक्निशिअन म्हणून काम करत होती. मंगळवारी तिची पलारीवैट्टम येथील टेलिफोन एक्स्चेंजमध्ये बदली करण्यात आली. दरम्यान अद्याप तिने नोकरी सोडण्यासंबंधी काहीही ठरवलं नसून, बदली व्हावी अशी आपलीच इच्छा होती असं सांगितलं आहे.
दुसरीकडे, काही संघटनांनी मोर्चा काढत रेहानाला कामावरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. केरळ मुस्लिम जमात परिषदने आधीच कारवाई करत हिंदूच्या भावना दुखावल्याबद्दल तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. इतकंच नाही तर जेव्हा रेहाना मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा काहीजणांनी तिच्या घरात घुसून तोडफोड केली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात रेहानाला मंदिरात नेण्यात आलं होतं. मात्र पुजाऱ्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला. फातीमाविरोधात पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.