व्होरांच्या फोन कॉलने केले मेहबुबांना चकित?
श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन.व्होरा यांच्या फोन कॉलमुळे मेहबुबा मुफ्ती यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ अचानकपणे संपुष्टात आला. या घडामोडीमुळे बहुधा मेहबुबाही चकित झाल्या.
मुख्यमंत्री कार्यालयात मेहबुबा यांचे कामकाज नित्याप्रमाणेच सुरू होते. दुपारच्या सुमारास मुख्य सचिव बी.बी.व्यास यांना व्होरांनी फोन केला. मुख्यमंत्री कुठे आहेत, अशी विचारणा करून व्होरा यांनी व्यास यांना त्यांच्याशी संपर्क करून देण्यास सांगितले. त्यानंतर व्होरा यांनी मेहबुबांना राज्य सरकारमधून भाजप बाहेर पडल्याची माहिती दिली. 59 वर्षीय मेहबुबांनी शांतपणे ती माहिती ऐकली.
अल्पसा पॉझ घेत मेहबुबा यांनी भाजपशी चर्चा करण्याची गरज नसल्याचे म्हणत व्होरांना राजीनामा देत असल्याचे सांगितले. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी दिल्लीत दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा पक्षाचा निर्णय जाहीर केला. त्या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटे आधी व्होरा आणि मेहबुबा यांचे फोनवरून संभाषण झाले.