वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवू नये – माजी मुख्य न्यायमूर्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/dipak-misra.jpg)
वैवाहिक बलात्काराचा गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये समावेश करु नये असे मत भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचा कायदा करण्याची गरज नाही. हे आपले व्यक्तीगत मत असल्याचेही दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केले. केएलई सोसायटीच्या लॉ कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दीपक मिश्रा यांनी त्यांचे हे मत मांडले.
काही देशांमध्ये वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवले जाते म्हणून भारतातही वैवाहिक बलात्काराचा गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये समावेश करावा असे मला वाटत नाही. गावांमध्ये अनेक कुटुंबात यामुळे अराजकाची स्थिती निर्माण होईल. कुटुंब व्यवस्थेमुळे आपला देश अजूनही टिकून आहे. आपल्याकडे अजूनही कौटुंबिक मुल्य आहेत. आपण अजूनही कुटुंबाचा आदर करतो असे दीपक मिश्रा म्हणाले.
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना दीपक मिश्रा यांनी आपले विचार व्यक्त केले. एलएलबीच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या एका विद्यार्थ्याने दीपक मिश्रा यांना भारतात बलात्कार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटत नाही का? वैवाहिक बलात्काराचा गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये समावेश करावा का ? असे प्रश्न त्यांना विचारले.
भारतात वैवाहिक बलात्कार किंवा नवरा बायकोवर शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो त्यासंबंधी कुठलाही कायदा नाही. वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्यासाठी महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या विविध संघटना न्यायालयासह वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न करत आहेत.