breaking-newsराष्ट्रिय

लोकसभा निवडणुकींपर्यंत पंतप्रधान मोदी भारतातच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे कायमच चर्चेचा विषय ठरतात. समर्थकांकडून हे दौरे फायद्याचे कसे आहेत हे सांगितले जाते तर विरोधक दौऱ्यावरील खर्चावरुन सरकारवर टिका करतात. मात्र आता पुढील चार महिन्यांमध्ये मोदी एकाही परदेश दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने मोदी भारताबाहेर जाण्याचे टाळणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीवर दिली आहे.

मोदींच्या परदेश दौऱ्यांशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये पंतप्रधान मोदींचा सहभाग आवश्यक असलेले कोणत्याही कार्यक्रमांचे परदेशामध्ये आयोजन करण्यात आलेले नाही. यावर्षी मोदींनी १४ परदेश दौरे केले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मोदी हे पक्षाचे प्रमुख प्रचारक असणार आहेत. याच महिन्यामध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला काँग्रेसने चांगलाच दणका दिला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकींची तयारी वेळेआधीच सुरु करण्याचा भाजपाचा मानस असल्याचे वृत्त आहे. म्हणूनच पंतप्रधान पदाची जबाबदारी आणि निवडणुक प्रचार असा दुहेरी भूमिका बजवण्याच्या तयारीत असणाऱ्या मोदींने परदेश दौऱ्यांना बगल देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते असे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी २१ ते २३ जानेवारी दरम्यान वाराणसीमध्ये होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोली यांच्या शपथविधीसाठी मालदीवच्या दौऱ्यावर गेले होते. तर अर्जेंटिनामधील जी-२० देशांच्या परिषदेसाठी मोदींनी परदेश दौरा केला होता. याआधी मोदींने ऑक्टोबर महिन्यामध्ये आशियाई देशांच्या परिषदेनिमित्त जपान आणि सिंगापूरचा दौरा केला होता. मात्र पंतप्रधान मोदींच्या औपचारिक वेबसाईटवरील वेळापत्रकानुसार आता पुढील काही महिने तरी मोदी भारतामध्येच असणार आहेत. असे असले तरी त्यांच्या दक्षिण आशियाई देशांच्या दौऱ्यासंदर्भात चर्चा सुरु असून अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नसल्याचीही माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग हे २७ डिसेंबर ते २९ डिसेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान शेरिंग हे पंतप्रधान मोदींना भूतान भेटीचे आमंत्रण देण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध पाहता मोदींना हे आमंत्रण स्वीकारावे लागेल असे मत सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र हा दौरा मोदी कधी करतील याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नसल्याचेही सरकारी अधिकारी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button