रेल्वेतील 3 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/railwaye-new.jpg)
येत्या काळात रेल्वेमधील तीन लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून 55 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती देण्यावर सध्या रेल्वे बोर्ड विचार करत आहे. रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या प्रमुखांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. तसेच सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यांकनाचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वेच्या सर्व विभाग प्रमुखांना 55 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांची एक यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 2020 च्या पहिल्या तिमाहीत ज्यांच्या सेवेची 30 वर्षे पूर्ण होतील त्यांच्या नावांचाही समावेश करण्यात येणार आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व विभागांच्या मॅनेजर्सना कर्मचाऱ्यांच्या कामांचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचा कामांचे मूल्यांकन करून सर्विस रेकॉर्ड तयार करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. या अंतर्गत रेल्वेतून तब्बल तीन लाख कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. तीन लाख कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर रेल्वेमध्ये 10 लाख कर्मचारी कार्यरत राहतील. रेल्वे बोर्डाकडून 27 जुलै रोजी यासंदर्भात एक पत्र पाठवण्यात आले आहे. तसंच सर्व विभागांना 9 ऑगस्ट पूर्वी ही यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कामाच्या मूल्यांकनाअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कर्मचाऱ्यांची शिस्त या सर्वांचा विचार करून एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. वेळोवेळी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यांकनाचाच हा एक भाग असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा शिस्तीशी निगडीत मुद्दा उपस्थित होईल, त्यांना वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.