breaking-newsराष्ट्रिय

रेल्वेच्या तांत्रिक सहकार्यासाठी फ्रान्सबरोबर सामंजस्य करार

  • ब्रुनेई दरुसालेमबरोबर करांच्या माहितीचे आदान प्रदान कराराला मंजूरी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाला भारतीय रेल्वे आणि फ्रान्सची एसएनसीएफ मोबिलिटीज कंपनीतील रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. या करारावर 10 मार्च 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे भारतीय रेल्वेला रेल्वे क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि ज्ञान याबाबत माहितीचे आदान -प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून तांत्रिक ज्ञान, अहवाल आणि तांत्रिक कागदपत्रांचे आदान-प्रदान तसेच विशिष्ट तंत्रज्ञानावर केंद्रित प्रशिक्षण आणि चर्चासत्र/कार्यशाळा आयोजित करण्यास मदत मिळेल.

या करारांतर्गत अति जलद आणि मध्यम अति-जलद रेल्वेसेवा, स्थानकाचे आधुनिकीकरण आणि परिचालन, विद्यमान परिचालन आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि उपनगरी गाड्यासंबंधी तांत्रिक सहकार्य होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्षेत्रात तांत्रिक सहकार्यासाठी विविध देशांचे सरकार आणि राष्ट्रीय रेल्वे बरोबर सामंजस्य करार केले आहेत. या अंतर्गत अतिजलद कॉरिडॉर, सध्याच्या मार्गांचा वेग वाढवणे, स्थानके जागतिक दर्जाची बनवणे, रेल्वे सुविधांचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे.

ब्रुनेई दरुसालेमबरोबर कर संकलन विषयक माहितीचे आदान प्रदान आणि सहाय्य याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला आणि या कराराच्या मंजुरीलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या करारात समविष्ट असलेल्या करांसंदर्भात, करविषयक देशांतर्गत कायद्याच्या अंमलबजावणीच्या सहाय्यासाठी सक्षम प्राधिकरणांना माहितीचे आदान-प्रदान करून सहाय्य करण्याची तरतूद या करारात आहे. या कराराअंतर्गत मिळालेली माहिती गोपनीय राहील आणि केवळ कर मुल्याकन, कर संकलन, अंमलबजावणी आणि अपील यांच्याशी संबंधी व्यक्तींकडेच ही माहिती उघड करता येईल.

दोन्ही देशात कर महसूल संकलन दाव्यांविषयी सहाय्य करण्याची तरतूद या करारात आहे. कोणत्याही विवादास्पद मुद्याचे निराकरण करण्यासाठी परस्पर संमती प्रक्रियेची तरतूद यामध्ये आहे. या करारामुळे माहिती देवाण घेवाण करण्याचा ओघ वाढून कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे.

भारत आणि कोलंबिया यांच्यात पारंपरिक औषध पद्धती क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे कोलंबियामधे भारतीय पारंपारिक औषध पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या सामंजस्य करारामुळे प्रशिक्षणासाठी तज्ञांचे आदान-प्रदान, पारंपरिक औषध पद्धतीमध्ये संशोधन सहयोग यातून औषध विकास आणि पारंपरिक औषध क्षेत्रात नाविन्य पूर्ण शोधाना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

ईक्विटोरियल गिनी बरोबर वनौषधी क्षेत्रातल्या सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य करारालाही आजच्या बैठकीत पूर्व लक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. या सामंजस्य करारामुळे वनौषधी क्षेत्रात उभय देशातले सहकार्य वृद्धिगत होणार आहे. संशोधन, प्रशिक्षण,परिषदा, बैठका आयोजित करण्यासाठी आवश्‍यक आर्थिक स्रोतांची तरतूद, राष्ट्रीय वनौषधी मंडळ, आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या मंजूर झालेल्या तरतुदीतून आणि आराखडा योजनेतून पुरवण्यात येणार आहेत.
भारत हा जैव समृद्धी लाभलेल्या जगातल्या देशांपैकी एक देश आहे.

17000-18000 पुष्प वनस्पतीपैकी 7000 पेक्षा जास्त वनस्पतींचा आयुर्वेद, युनानी, सिध्द, होमिओपॅथी मधे औषधी उपयोग केला जातो. सुमारे 1178 वनौषधींचा व्यापार केला जात असून 242 वनौषधींचा वार्षिक उपयोग 100 मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे.वनौषधी या पारंपरिक औषध आणि वनौषधी उद्योगाचा महत्वाचा भाग आहेत त्याचबरोबर भारतातल्या मोठ्या जन संख्येच्या उदरनिर्वाहाचेही साधन आहेत. जगभरात पारंपारिक आणि पर्यायी उपचार पद्धतीला मोठी पसंती लाभत असून सध्या 120 अब्ज अमेरिकी डॉलरवर असलेला वनौषधीचा हा व्यापार 2050 पर्यंत 7 ट्रीलीयन अमेरिकी डॉलरवर पोचेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय रेल्वे आणि फ्रान्सची एसएनसीएफ मोबिलिटीज कंपनी यांच्यातील रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. या करारावर 10 मार्च 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

मोरोक्कोबरोबर खाण आणि भूविज्ञान सामंजस्य करार 
खाण आणि भूविज्ञान क्षेत्रात भारत आणि मोरक्को यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला, केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी दिली आहे. मोरक्कोचे उर्जा, खाण आणि शाश्वत विकास मंत्रालय आणि भारताचे खाण मंत्रालय यांच्यात नवी दिल्लीत 11 एप्रिल 2018 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या सामंजस्य करारामुळे खाण आणि भूविज्ञान क्षेत्रात भारत आणि मोरक्को या दोन्ही देशांच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी हे सहकार्य परस्परांना फायदेशीर ठरणार आहे. कायदा क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी सहकार्याबाबतही मोरोक्कोबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button