रेलभवन मध्ये आता रेल नीर नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rail-neer.jpg)
नवी दिल्ली – आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेल्या भारतीय रेल्वेने आता काटकसरीच्या विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्या अंतर्गत आता रेल्वेच्या मुख्यालयात म्हणजेच रेल भवन मधील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे रेल नीर हे मिनरल वॉटर बंद करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या पाण्याच्या बाटल्या घरून आणाव्यात किंवा रेलभवनमध्ये नव्याने बसवण्यात आलेल्या आरओ प्लांट मधून त्यांनी हे पाणी प्यावे असे आदेश त्यांनी काढले आहेत.
आरओ यंत्रणेतून मिळणारे पाणी रेलनीर इतकेच शुद्ध असल्याचे आम्ही तपासून घेतले आहे असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तथापी रेलभवन मध्ये होणाऱ्या बैठका आणि परिषदांसाठी मात्र रेलनीर याच पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जातील असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या खर्चाने बाहेरून अन्न मागवण्याची प्रथाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान रेल्वे भवनातील कर्मचाऱ्यांसाठी रेलनीर पाणी बाटल्या पुरवणे बंद करण्याच्या निर्णयावर कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आरओचे पाणी शुद्ध नसल्याची त्यांची तक्रार आहे.