राहुल गांधींची मोदींना जादुची झप्पी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/rahul-modi-1zappi.jpg)
सभागृह अवाक ! अनेकांनी केले कौतुक, काहीनी केली टीका
नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करून सरकारवर जोरदार टीका केली. पण भाषणाच्या अखेरीला त्यांनी भाषण संपवून थेट मोदींच्या आसनाकडे जाऊन त्यांना आलिंगन दिले. त्यावेळी सारे सभागृह अवाक झाले. अनेकांनी जागेवर उभे राहुन राहुल गांधींच्या या कृत्याकडे कौतुकाने पाहिले पण राहुल गांधी यांची ही कृती सभागृहातील नियमाला अनुसरून नाहीं अशी समज लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी दिली तर एक केंद्रीय मंत्री हरसिमरन कौर यांनी राहुल गांधी यांच्या कृतीला आक्षेप घेताना हे लोकसभेचे सभागृह आहे येथे मुन्नाभाईची झप्पी, पप्पी चालणार नाही अशी टिप्पणी केली.
तत्पुर्वी राहुल गांधी आपल्या भाषणाचा समोराप करताना म्हणाले की तुम्ही मला कितीही वेळा पप्पु म्हणा पण माझ्या मनातील तुमच्या विषयीचे प्रेम कदापिही कमी होणार नाहीं. तुमच्या मनात कॉंग्रेस विषयी कितीही द्वेष भावना असली तरी मी मात्र तुमच्या मनात कॉंग्रेस विषयी सद्भवनाच निर्माण करून दाखवीन असे नमूद करून त्यांनी मोदींना भर सभागृहातच अलिंगन देऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले.
मोदी सरकारवर कठोर टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही थेट शाब्दिक हल्ला चढवला होता. राफेल वरील आरोप केल्यानंतर मोदींना उद्देशून ते म्हणाले की माझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचे तुम्हाला धैर्य नाहीं. मी राफेल भ्रष्टाचाराविषयी बोलत असताना मोदीजी सभागृहात इकडेतिकडे बघत आहेत पण माझ्या कडे मात्र पाहण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही.
मोदींचा उल्लेख त्यांनी चौकीदार नव्हे तर भागीदार असाही केला होता. इतक्या कडक शब्दांतील भाषणानंतर त्यांनी एकदम मोदींना सभागृहात त्यांच्या जागेवर जाऊन आलिंगन देण्याच्या कृतीचे मात्र अनेकांना नवल वाटले.