Breaking-newsराष्ट्रिय
राफेल स्वस्तात मिळाली म्हणता मग ती कमी का खरेदी केली- पी चिदंबरम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/chiddi-story.jpg)
- चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल
काराईकुडी- आम्ही युपीए सरकारच्या दरापेक्षा अधिक स्वस्तात राफेल विमाने खरेदी केली असा भाजप-एनडीएचा दावा आहे. जर त्यांना ही विमाने स्वतात मिळाली तर 126 विमानांची गरज असताना केवळ 36 विमानेच का खरेदी केली असा सवाल ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. ते म्हणाले की हवाईदलाची गरज 126 विमानांची असताना एनडीए सरकारने केवळ 36 विमानेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक त्यांनी युपीएपेक्षा अधिक स्वस्त दराने ही विमाने जर उपलब्ध झाली आहेत तर त्यांनी इतकी कमी विमाने खरेदी करण्याचे कारण लोकांना समजले पाहिजे असे ते म्हणाले. या सरकारने आमच्या सरकारने केलेला करार रद्द करून नवीन करार केला आणि त्यात हा सारा घोळ झाला असेही त्यांनी नमूद केले.
विमानांच्या किमंतीच्या संबंधात त्यांनी पुन्हा खोचक प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले की एनडीएला ही विमाने स्वस्तात मिळाली असा जर त्यांचा दावा असेल तर ती नेमकी किती स्वतात मिळाली याची माहितीही त्यांनी जनतेला द्यायला हवी. पण ती माहितीही देण्यास ते तयार नाहीत. या साऱ्या व्यवहाराच्या संबंधात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना काहीही माहिती नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एनडीएच्या काळात तीन संरक्षण मंत्र्यांनी या व्यवहाराची काळजी घेतली त्यातील एकालाही आपली जबाबदारी नीट पार पाडता आली नाही असे ते म्हणाले. युपीए पेक्षा 20 टक्के कमी दराने आम्ही विमाने घेतली असे अर्थमंत्री अरूण जेटली म्हणतात पण मनोहर पर्रिकर यांनी 2015 साली दूरदर्शनला जी मुलाखत दिली होती त्यात त्यांनी म्हटले आहे की ही विमाने खूप महाग असल्याने आम्ही 126 ऐवजी केवळ 36 विमानेच घेण्याचा निर्णय घेतला. यात नेमके कोण खोटे बोलत आहे असा सवाल चिदंबरम यांनी केला.