युवतीचा भावोजींवर जडला जीव, गर्भवती बहिणीचीच केली हत्या
![Shocking! The body of an 89-year-old mother was found hidden in the house at a cost of Rs 43 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/murder-crime.jpg)
बहिणीच्या नवऱ्याबरोबर लग्न करण्यासाठी एका १९ वर्षीय युवतीने गर्भवती बहिणीचीच हत्या केली. मध्य प्रदेशातील जबलपूरमधल्या शाहपूर नगरातील कायथरा वस्तीमध्ये २७ जुलै रोजी ही धक्कादायक घटना घडली. शताक्षी राजपूत असे आरोपी तरुणीचे नाव आहे. बहिणीच्या नवऱ्याबरोबर लग्न करण्याच्या उद्देशाने तिने हा गुन्हा केला. शताक्षी आपल्या मोठया बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली होती.
शताक्षीच्या मोठया बहिणीचे नाव अभिलाषा आहे. अभिलाषा बाथरुममध्ये गेलेली असताना शताक्षीने चाकूने भोसकून तिची हत्या केली. अचानक झालेल्या हल्ल्याने अभिलाषा बाथरुममध्येच रक्ताच्या थारोळयात कोसळली. शेजाऱ्यांना याबद्दल कळल्यानंतर त्यांनी अभिलाषाला लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण तिथे तिचा मृत्यू झाला. बहिणीची हत्या करण्याचा शताक्षीचा हा तिसरा प्रयत्न होता असे पोलिसांनी सांगितले. मेहुण्याबरोबर संसार थाटण्यासाठी आपण हा गुन्हा केल्याचे तिने चौकशीत कबूल केले.
शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी सुद्धा आपण अभिलाषाची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यात अयशस्वी ठरलो असे तिने सांगितले. २७ वर्षीय अभिलाषाची हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी शताक्षीला चेहरा झाकून तिथून पळताना पाहिले. शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. मोबाइल फोनच्या लोकेशनवरुन पोलिसांनी शताक्षीला शोधून काढले. अभिलाषाच्या नवऱ्यानेच पोलिसांना शताक्षीचा मोबाइल नंबर दिला. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि गुन्ह्याच्यावेळी वापरलेले कपडे आपल्या ताब्यात घेतले आहेत.