‘यामुळे’ यंदा साहित्याचे नोबेल जाहीर होणार नाही
स्टॉकहोम – स्वीडीश अकॅडमीने यंदा साहित्याचे नोबेल पुरस्कार जाहीर होणार नाही असे जाहीर केले आहे. या अकॅडमीकडून साहित्याचे नोबेल पुरस्कार जाहीर न केले जाण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. सन 2019 च्या पुरस्काराच्यावेळीच सन 2018 सालचे साहित्य विषयक नोबेल पुरस्कार जाहीर केला जाईल असे या अकॅडमीने म्हटले आहे. ही अकॅडमी 1786 साली स्थापन झाली आहे. या आधी सात वेळा एखाद्या क्षेत्रातील पुरस्कार राखून ठेवण्याचा किंवा तो त्यावर्षी जाहीर न करण्याचा प्रकार घडला आहे. असा शेवटचा प्रकार सन 1949 साली घडला आहे.
या अकॅडमीच्या सदस्य असलेल्या कवयत्रि कॅटरीना फ्रोस्टेन्सन यांचे पती जीन क्लाऊड अर्नाल्ट यांच्यावर अठरा महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर अकॅडमीची पुरस्कार देणारी समितीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळेच बहुधा यंदाचा साहित्य विषयक नोबेल पुरस्कार जाहीर झाला नसावा असे सांगितले जात आहे. या समितीचे एकूण 18 सदस्य आहेत. या वादग्रस्त प्रकरणामुळे यापुढे नेमके काय करावे याविषयी समितीच्या सदस्यांमध्येच वाद निर्माण झाले. त्यातून सहा सदस्यांनी राजीनामे दिले. या निवड समितीविषयी विश्वासाचे वातावरण प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल त्यामुळे आम्ही यंदाचा साहित्य विषयक नोबेल पुरस्कार जाहीर करणार नाही असे या अकॅडमीचे सेक्रेटरी ऍन्डर्स ओल्सन यांनी म्हटले आहे.