‘मोहम्मद अली जीना आणि अमित शाह यांच्यात साम्य’
प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात काही बाबतीत साम्य असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ‘गांधी- द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८’ या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी गुहा बोलत होते.
शनिवारी दिल्लीमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी गुहा यांनी जीनांच्या व्यक्तीमत्वावर चर्चा केली. ‘जीना हे स्पष्ट वक्ता होते आणि एकपक्षीय एजेंडा राबवणारे चाणाक्ष राजकारणी होते. 1930 च्या दशकाच्या सुरूवातीला, पाकिस्तानची निर्मिती व्हावी आणि मी त्याचा नेता बनावं हा एकमेव एजेंडा त्यांचा होता’, असं पीटीआयसोबत बोलताना गुहा म्हणाले. पुढे बोलताना गुहा म्हणाले की, ‘पाकिस्तानची निर्मिती हेच जीनांचे एकमेव ध्येय होते. ते एक चाणाक्ष राजकारणी होते. काही बाबतीत तुम्ही भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि जीनांची तुलना करु शकतात. कारण काहीही झालं तरी चालेल पण मला निवडणूक जिंकायचीच आहे असं अमित शाह म्हणतात, आणि कितीही लोक मेले तरी चालतील, मला स्वतंत्र पाकिस्तान हवाच, अशी भूमिका जीनांची एकेकाळी होती’.