मोदी लाट ओसरली, दीड वर्षात ‘ही’ राज्ये झाली भाजपामुक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Modi-5.jpg)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. यामुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती.
२०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली.
२०१४ साली भाजपा गुजरात, मध्यप्रेधेस, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती. तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) या आठ राज्यांमध्ये भाजपा सरकार नव्हते.