मोदी यांच्याबद्दलच्या व्हिडीओमुळे वाद ; स्मृती इराणी यांची प्रियंका गांधी यांच्यावर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/smriti-irani-priyanka-gandhi-1.jpg)
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या उपस्थितीत काही लहान मुले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करीत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. सदर मुलांना अपशब्द वापरण्यापासून आपण रोखले, मात्र मुले अपशब्द वापरत आहेत तेवढाच भाग भाजपच्या नेत्यांनी नेमका वापरला, असे प्रियंका यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुसंस्कृत घरातील मुलांनी प्रियंका यांच्यापासून लांब राहावे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.
समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे, त्यामध्ये काही लहान मुले प्रियंका यांच्यामोर घोषणा देत आहेत. प्रथम या मुलांनी प्रियंका आणि राहुल झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यानंतर या मुलांनी अचानक मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या घोषणा दिल्या. हे पाहताच प्रियंका हादरल्या आणि त्यांनी या मुलांना अशा प्रकारची घोषणाबाजी थांबविण्यास सांगितले.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या व्हिडीओवरून गांधी यांच्यावर टीका केली आहे. सुसंस्कृत घरातील मुलांनी प्रियंका यांच्यापासून दूर राहावे असे इराणी यांनी म्हटले आहे. प्रियंका गांधी ज्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत त्यावरून त्यांची विचारसरणी दिसून येते, असे इराणी यांनी म्हटले आहे. प्रियंका यांनीच मुलांना मोदींबद्दल अपशब्द वापरण्यास सांगितले, कोणी शिकविल्याशिवाय मुले असे कसे बोलतील, असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधानांबाबत अशा घोषणा देणे योग्य नाही असे आपण त्या मुलांना सांगितले आणि त्यांना घोषणा देण्यापासून रोखले, मात्र भाजपने ते दाखविले नाही आणि आपल्यावरच आरोप केले जात आहेत, असे प्रियंका यांनी म्हटले आहे.