मायावतींच्या निर्णयाने कॉंग्रेसवर विपरीत परिणाम नाही- राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rahul-gandhi_express.jpg)
- लोकसभा निवडणुकीत त्या आमच्या बरोबर येतील
नवी दिल्ली- बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी मध्यप्रदेशात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा कॉंग्रेस पक्षाचा तेथील यशावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की काही राज्यांतील निवडणूका त्या स्वबळावर लढवणार असल्या तरी सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या आमच्या बरोबर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
येथे एका परिसंवादात बोलताना राहुल गांधी म्हणाले की त्यांच्या या निर्णयामुळे कॉंग्रेसच्या यशावर काही विपरीत परिणाम होईल असे आपल्याला वाटत नाही. तथापी त्या जर आमच्या बरोबर असत्या तर बरे झाले असते असेही त्यांनी नमूद केले. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीगड या सर्व राज्यांत कॉंग्रेसच विजयी होईल असे ते म्हणाले. ते म्हणाले की राज्यातील निवडणूकीसाठी आघाडी आणि केंद्रातील निवडणुकीसाठी आघाडी हे दोन वेगळे विषय आहेत. स्वत: मायावती यांनीही ते सूचित केले आहे. आम्ही राज्यांतील निवडणुकांसाठी अत्यंत लवचिक धोरण स्वीकारले आहे. त्यांच्याशी आमची चर्चाही सुरू होती पण त्यांनी स्वत:च वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे असे राहुल गांधी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांची आमच्याशी आघाडी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाशी आघाडी व्हावी अशी इच्छा राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांनी व्यक्त केली होती पण कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यात अडथळा आणला असा दावा मायावती यांनी केला होता.