महिला संशोधकांनाही समान संधी मिळावी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Smriti-Irani.jpg)
- वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचे प्रतिपादन
‘महिला संशोधक हा देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय असून देशभरातील अडीच लाख संशोधकापैकी अवघ्या चौदा टक्के महिला आहेत. बहुतेक महिला संशोधकांना पदोन्नती, वेतन यांबाबत समान वागणूक मिळत नसल्याचे दिसून येते. त्यांनाही समान संधी मिळावी,’ असे मत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी व्यक्त केले.
फगवाडा येथील भारतीय विज्ञान काँग्रेसमधील महिला वैज्ञानिक संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात इराणी बोलत होत्या. संशोधनक्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी असण्यामागे सामाजिक मानसिकता कारणीभूत असल्याचा मुद्दा मांडून त्या म्हणाल्या, ‘मुले आणि मुली यांना खेळण्यासाठी आपण काय देतो त्यावरूनही नकळतपणे लिंगभेदाची मानसिकता तयार होत असते. मुलींना खेळायला बाहुली आणि मुलांना मेकॅनो दिला जातो तेव्हा विशिष्ट विषय मुलांसाठी किंवा मुलींसाठी असल्याचे समज तयार होत असतात. एखादे क्षेत्र महिलांच्या आकलनापलीकडे असते, एखादा प्रकल्प महिलांच्या आवाक्याबाहेर असतो, अशा अनेक समजांमधून तयार झालेली महिलांची ही प्रतिमा विकासासाठी मारक आहे.’
‘संशोधन क्षेत्राचे उत्तम भाविष्य असावे असे वाटत असेल तर संशोधनक्षेत्रातील महिलांचे वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करण्याला पर्याय नाही. संशोधन क्षेत्रातील प्रगतीसाठी उत्तम संशोधन पत्रिका, शोध निबंध हे स्थानिक भाषांमधून उपलब्ध करून देण्यात यावेत’, असेही इराणी म्हणाल्या. या वेळी संशोधक विजयलक्ष्मी सक्सेना यांची २०२० मध्ये होणाऱ्या विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.