महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-632.jpg)
- विक्रमसिंघे पुन्हा श्रीलंकेचे पंतप्रधान
श्रीलंकेतील सत्तासंघर्ष संपवताना महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा शनिवारी राजीनामा दिला आहे. त्यांची नेमणूक करण्याचा वादग्रस्त निर्णय अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी घेतला होता. आता रनिल विक्रमसिंघे यांचा पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून रविवारी शपथविधी होईल.
राजपक्षे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निकालानंतर राजीनामा दिला असून न्यायालयाने संसद बरखास्त करण्याचा निर्णय व राजपक्षे यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य ठरवली होती.
राजपक्षे समर्थक खासदार शेहान सेमासिंगे यांनी सांगितले की, माजी अध्यक्षांनी कोलंबोतील विजेरामा येथील त्यांच्या निवासस्थानी राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केली. राजपक्षे यांनी युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्सच्या खासदारांना त्यांच्या राजीनाम्याची माहिती कळवली आहे. राजपक्षे यांची २६ ऑक्टोबर रोजी सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती करताना आधीचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून काढले होते. त्यामुळे देशात राजकीय पेच निर्माण झाला होता.
संसद खासदार लक्ष्मण यापा अबेयवर्दना यांनी सांगितले की, राजपक्षे यांनी दशकभर श्रीलंकेत सत्ता सांभाळली असून त्यांनी देशाच्या हितासाठी राजीनामा दिला आहे. राजपक्षे पंतप्रधानपद ठेवू शकले असते पण देशात राजकीय पेच त्यांना नको होता. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या निकालानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला. राजपक्षे यांनी केलेल्या अपिलावर १६, १७ व १८ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.