मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत गोव्याच्या विधानसभा उपाध्यक्षांनी केला खुलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/goa-minister-lobo.jpg)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अद्यापही आपले काम पाहत असले तरी त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होताना दिसत नाही, अशी माहिती गोव्याचे विधानसभा उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली आहे.
लोबो म्हणाले, आपले मुख्यमंत्री खूपच आजारी आहेत हे लोकांनी आता लक्षात घ्यायला हवे. देवाच्या कृपेने ते अद्यापही आपल्यात आहेत. देवानेच त्यांना काम करण्यासाठी आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत मनोहर पर्रिकर आहेत भाजपा युती सरकारला कोणतेही संकट नाही. मात्र, त्यांनी जर आपले पद सोडले किंवा ते जर नसले तर संकटाची स्थिती निर्माण होईल.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांना त्रास होऊ लागल्याने सुरुवातीला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोन महिने अमेरिकेत उपचार झाले. त्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयातही त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. अनेक उपचार होऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नाही.
गोवा विधानसभेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पर्रिकर नुकतेच विधानसभेत दाखल झाले होते. त्यावेळचे त्यांचे फोटोही माध्यमांसमोर आले होते. यामध्ये ते एका श्वासनलिकेसह वावरत असल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर लोबो यांनी त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.