मंगळवारी 22 मीटर लांब उल्का पृथ्वी जवळून जाणार, नासाची माहिती
नवी दिल्ली- गेल्या महिन्यात एक उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक 22 मीटर लांब उल्का मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. ही उल्का चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतरापेक्षा कमी अंतरातून जाणार आहे. ही उल्का पृथ्वीला आदळणार नसल्याने पृथ्वीला कोणताही धोका नाही, अशी माहिती यूएस स्पेस एजन्सी नासाने दिली आहे.
पृथ्वी जवळून जाणाऱ्या या उल्काचे ऍस्टिरॉईड 2011 इएस 4 असे नाव आहे. गेल्या दहा वर्षातील ही उल्का पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणाऱ्यांपैकी एक असल्याचे समजते आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या सांगण्यानुसार 13 मार्च 2011 रोजी एक उल्का पृथ्वीच्या जवळून गेली होती. ही उल्का पृथ्वीपासून केवळ 45 हजार मैलांवरून जाईल. या उल्केचा आकार 22 ते 49 मीटर असून मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 रोजी ही उल्का पृथ्वी आणि चंद्राच्या जवळून जाणार असल्याचा दावा नासाने केला आहे. ऍस्टिरॉईड 2011 इएस 4 हे पृथ्वीवर आदळणार आहे की नाही? अशी चिंता लागलेल्या जगभरातील लोकांना नासा ऍस्टिरॉईड वॉचने ट्विट करत सांगितले आहे की, ऍस्टिरॉईड 2011 इएस 4 हे पृथ्वीवर आदळणार नाही आहे. त्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही आहे.