भारतीय लष्कराचा पराक्रम… अवघ्या ४० दिवसांमध्ये बांधला सिंधू नदीवरील सर्वात लांब झुलता पूल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Bridge.jpg)
भारतीय लष्कर सिमेवर देशाची सुरक्षा करण्याबरोबरच देशात अनेक ठिकाणी मदतकार्य करत असते. नैसर्गिक आपत्ती, मोठे अपघात, मदतकार्यासाठी अनेकदा लष्कराला पाचारण केले जाते. भारतीय लष्कराने अनेक अशक्य कामे सहज शक्य करुन दाखवली आहेत. मग ते अगदी दूर्गम भागात मदतकार्य करणे असो किंवा ११७ दिवसांत परळ ते एल्फिन्स्टन रोड पूल बांधणे असो भारतीय लष्कर अनेकदा त्यांच्या कामाने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देते. असाच आणखीन एक पराक्रम भारतीय लष्कराने नुकताच करुन दाखवला. हा पराक्रम म्हणजे लडाख येथील लेहजवळ सिंधू नदीवर लष्कराने सर्वात लांब झुलता पूल बांधला आहे.
लडाखमधील दूर्गम भागातील गावांना जोडणारा हा पूल २६० फूट लांबीचा आहे. या पूलाचे नाव ‘मैत्री पूल’ असे ठेवण्यात आले आहे. या पुलामुळे चोगलामसर, स्टोक आणि चुचोट गावे लडाखच्या मुख्य भागांना जोडली गेली आहेत.
या पूलाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी झाले. हा पूल लष्करातील लडाऊ अभियंत्रिक दलाच्या ‘साहस और योग्यता’ रेजिमेंटने बांधला आहे. हा पूल अवघ्या ४० दिवसांमध्ये बांधण्यात आला असून इतक्या कमी वेळात एवढ्या लांबीचा झुलता पूल बांधणे हा एक विक्रमच आहे.
अनेकांनी या विक्रमासाठी भारतीय लष्कराचे अभार मानला आहेत.
मागील वर्षी हिमाचल प्रदेशमधील मनालीपासून कारगीलमधील झंसकार मार्गे लडाखपर्यंतचा रस्ता बांधण्यात आला होता. यामुळे हिमाचलमधून लडाखमध्ये जाणे अधिक सोप्पे झाले आहे.