breaking-newsराष्ट्रिय

भारताकडून इतर देशांना पेट्रोल 34 रु. , डिझेल 37 रु. !

  • पेट्रोल 34 रु आणि डिझेल 37 रु. लिटर
  • माहितीच्या अधिकारात झाले उघड

नवी दिल्ली – भारत इतर देशांना पेट्रोल 34 रु आणि डिझेल 37 रु. लिटर दराने विकत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. खुद्द भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भिडणारे दर हा जनतेच्या चिंतेचा आहे, तर विरोधी पक्षांसाठी सरकारला धारेवर धरण्याचा विषय बनलेला आहे.

पंजाबचे रोहित सबरवाल यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले आहे, की मेंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. ने 1 जानेवारी 2018 ते 30 जून 2018 या काऴात हॉंगकॉंग, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर आणि यूएई या पाच देशांना 32 ते 34 रुपये लिटर दराने रिफाईन्ड पेट्रोल आणि 34 ते 36 रुपये दराने डिझेलची विक्री केली आहे. याच काळात भारतात मात्र पेट्रोल 69.97 रु. ते 75.55 रु.लिटर आणि डिझेल 59.70 ते 67.38 रु. लिटर दराने विकले जात होते. भारतात पेट्रोल आणि डिझेलवर 125 ते 150 टक्के कर आकारला जात आहे.

हॉंगकॉंग, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर आणि यूएई या पाच देशांप्रमाणेच अमेरिका, इंग्लंड, इराक, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, जॉर्डन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनाही भारत रिफाईन्ड पेट्रोल आणि डिझेल निर्यात करतो.
इतर देशांना स्वस्त दराने पेट्रोल आणि डिझेल देण्यास काहीच हरकत नाही. जर या विक्रीतून देशाला कमाई होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आपल्याच देशात त्यावर 125 ते 150 टक्के कर लादला जात आहे. परिणामी बहुतेक राज्यांमध्ये पेट्रोल 75 ते 82 रु. लिटर आणि डिझेल 66 ते 74 रु. लिटर दराने विकले जात आहे. आणि पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास सरकारने नकार दिल्याने त्याचे दर कमी होण्याच्या आशा समाप्त झाल्या आहेत असे रोहित सबरवाल यांनी म्हटले आहे.

भारत कच्चे तेल आयात करून ते रिफाईन्ड करून विक्री करतो. सन 2017 मध्ये भारताने 21.1 अब्ज डॉलर्सचे रिफाईन्ड तेल निर्यात केले होते. भारतीय कंपन्यांनी गेल्या 20 ऑगस्ट रोजी 35.90 रु.दराने कच्चे पेट्रोल आणि 38.25 रु. दराने कच्चे डिझेल आयात करून अनुक्रमे 37.93 रु दराने पेट्रोल आणि 41.04 रु. दराने डिझेल निर्यात केले होते. हे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर निश्‍चित केले जातात.

या गोष्टीचे राजकारण होण्यास सुरुवात झालेली आहे, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती ट्‌विट करून म्हटले आहे, कीआरटीआयने भाजपाचे पितळ उघडे पाडले आहे. प्रत्यक्षात कॉंग्रेस राजवटीतही हे सर्व कर पेट्रोल आणि डिझेलवर लागू केले जातच होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button