भाजपा खासदाराच्या सुरक्षा रक्षकांचा टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्यांना मारहाण
मध्य प्रदेशात भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता भाजपा खासदाराच्या सुरक्षा रक्षकांनी टोल नाक्यावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे हे सर्व घडत असताना खासदार तिथे उपस्थित होते.
भाजपा खासदार राम शंकर काथेरिया यांच्या सुरक्षरक्षकांनी आग्रा टोल नाक्यावर वादावादी झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करुन हवेत गोळीबार केला. एएनआय वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये बंदुक बाहेर काढण्याआधी राम शंकर काथेरीया यांचे सुरक्षा रक्षकांनी तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर हवेत गोळीबार केला. एका सुरक्षा रक्षकाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला ढकलले तर दुसऱ्याने हवेत गोळी चालवली. ही घटना घडली तेव्हा राम शंकर काथेरीया तिथे उपस्थित होते.