भाजपच्या कर्नाटक बंदला अल्प प्रतिसाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/BJP-1-8.jpg)
बंगळुरू – राज्यातील कॉंग्रेस-जेडीएस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली नाहीं म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी कर्नाटकातील भाजपने आज राज्यव्यापी बंदची हाक दिली होती पण या बंदला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की राज्यातील सामान्य जनजीवन आज सुरळीत पणे सुरू होते. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत पणे सुरू होती. शेतकऱ्यांच्या बहुतांश संघटनांनी तसेच कन्नड भाषिक संघटनांनी बंद कडे पाठ फिरवल्याचेही यात म्हटले आहे. या बंद मागे राजकारण असल्याची भावना निर्माण झाल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.
दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने केली. आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर 24 तासात राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार कोटी रूपयांची कर्ज माफी जाहीर केली जाईल अशी घोषणा सत्ताधारी आघाडीने केली होती. पण 24 तास उलटल्यानंतरही राज्य सरकारने ही कर्जमाफी जाहींर केली नाही म्हणून भाजप नेते येडियुरप्पा यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. काल येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की आम्ही स्वत: बंद पुकारणार नाही तर शेतकऱ्यांनीच पुकारलेल्या बंदला आम्ही पाठिंबा देणार आहोत. राज्यातील शेतकरी आणि जनता स्वयंस्फुर्तीने बंद पाळेल असे प्रदेश भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.