बुलंदशहर ‘एफआयआर’मधील चार नावांना आक्षेप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/bulandshahar.jpg)
नयाबन्स भागातील सात जणांची नावे गोहत्या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवालात असून, त्यात दोन मुलांचा समावेश आहे. यात समाविष्ट नावातील एक जण या गावात राहतही नाही. या प्राथमिक माहिती अहवालातील चार नावांना गावकऱ्यांनी आक्षेप घेतला असून, यातील एक मुस्लीम गावकरी त्या वेळी चाळीस किलोमीटर अंतरावर दुसऱ्याच धार्मिक कार्यक्रमास गेला होता. बुलंदशहर येथे गोहत्येच्या प्रकरणानंतर जमावाने हिंसाचार केला होता, त्यात एक पोलीस निरीक्षक व एक नागरिक असे दोन जण ठार झाले होते.
बजरंग दलाचा जिल्हा समन्वयक योगेश राज याने दिलेल्या तक्रारीवरून प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून, सोमवारी येथील जंगलात गोहत्येचा प्रकार झाला होता. राज हा जमावाच्या हिंसाचारातील प्रमुख आरोपी असून तो सोमवारपासून फरार आहे. पोलिसांनी सुबोध कुमार सिंह व सुमित कुमार यांच्या मृत्यूस कारण ठरलेल्या जमावाच्या हिंसाचाराची चौकशीही सुरू केली आहे. यात गोहत्येबाबत एक व जमावाच्या हिंसाचाराबाबत एक असे दोन प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामस्थांच्या मते प्राथमिक माहिती अहवालात १० वर्षांच्या पाचवीतील मुलाचा तसेच १२ वर्षांच्या सहावीतील मुलाचा समावेश आहे. या दोघांची नावे काढून टाकावी अशी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी मला सियाना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. तेथे तीन तास तिष्ठत ठेवले असे मुलाच्या वडिलांनी सांगितले. सहावीतील मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार पहाटे सव्वादोन वाजता पोलीस घरी आले. त्यांनी तपासणी सुरू केली. ते शेहजाद व कासिम यांचा शोध घेत होते. सगळे घर अस्ताव्यस्त करून ते निघून गेले. तू नवऱ्याला कुठे लपवलेस ते सांग, असे पोलीस विचारत होते, पण तो दिल्लीला असतो असे तिचे म्हणणे आहे. दोन मुस्लीम मुलांची नावे यात आली असून, त्यात महंमद हुसेन सफ्रुद्दीनचे नाव चुकीने घेतले आहे असे त्याचा भाऊ महंमद हुसेन याने सांगितले. त्याच्यासह अनेक लोक इजतिमासाठी गेले होते असे त्याचे म्हणणे आहे. सुदैफ चौधरी यांच्या नावावरही आक्षेप आहेत, कारण ते या गावात राहात नाहीत.