बसपा नेत्याचा प्रेयसीसाठी MBA पेपर लीक करण्याचा प्रयत्न, अटक होताच प्रेयसी फरार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/BSP-Leader.jpg)
उत्तर प्रदेश पोलिसांनी बहुजन समाज पक्षाच्या नेत्याला अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याच्या सहाय्याने एमबीएचा पेपर लीक केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. बसपाचा हा नेता आपल्या प्रेयसीसाठी पेपर लीक करण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे अटक झाल्याची माहिती मिळताच बसपा नेत्याची प्रेयसी फरार झाली आहे. आरोपीचं नाव फरोज आलम उर्फ राजा आहे.
आपल्या प्रेयसीला मदत करण्यासाठी पेपर लीक करत होतो अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. फरोज आलम याची प्रेयसी विद्यापीठात एमबीएचं शिक्षण घेत होती. पेपर लीक करण्यासाठी आपण विद्यापीठातील कर्मचारी इरशाद याची मदत घेतल्याचं त्याने सांगितलं आहे. मोबदला म्हणून विद्यापीठात कायमची नोकरी देण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं.
आलम याने उत्तर प्रदेश पोलिसांना सांगितलं आहे की, आपण प्रेयसीला परीक्षेचा पेपर आणून देऊ असं आश्वासन दिलं होतं. यानंतर आलमने प्रेयसीला जाणुनबुजून दुसरी प्रश्नपत्रिका दिली . पण लवकरच तिला हा परीक्षेतील पेपर नसल्याचं लक्षात आलं. यामुळे नाराज होऊन तिने आलमशी बोलणं बंद केलं होतं. यानंतर आलम आणि त्याचा मित्र हैदर यांनी इरशादला पेपर लीक करण्यासाठी तयार केलं.
आरोपी ज्या ठिकाणी भेटायचे तो फ्लॅट पोलिसांनी जप्त केला आहे. हा फ्लॅट हैदरचे काका तहसीम सिद्दीकी यांचा आहे. सिद्दीकी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं. ‘ही टोळी दोन हजार रुपयांत प्रश्नपत्रिका विकत होती. यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.